ओबीसी (OBC) मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १००% मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (MahaDBT)
महाराष्ट्र शासनाच्या 'ओ.बी.सी., व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी. कल्याण विभागा'तर्फे इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या वाटा सुकर करणारी एक अत्यंत महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. मॅट्रिकनंतर (१० वी आणि १२ वी नंतर) व्यावसायिक अभ्यासक्रमांना (Professional Courses) प्रवेश घेणाऱ्या ओबीसी मुलींना आर्थिक पाठबळ देणे, त्यांच्या उच्च शिक्षणाला चालना देणे आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
काय आहेत या योजनेचे फायदे?
(Benefits) शासनाच्या ८ जुलै २०२४ च्या नवीन निर्णयानुसार (GR), या योजनेअंतर्गत पात्र ओबीसी विद्यार्थिनींना (मुलींना) १००% शिक्षण शुल्क (Tuition Fee), परीक्षा शुल्क (Exam Fee) आणि देखभाल भत्ता (Maintenance Allowance) दिला जातो.
१. शिक्षण व परीक्षा शुल्क: शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलींचे संपूर्ण शिक्षण व परीक्षा शुल्क शासनाकडून भरले जाते. (B.Ed. आणि D.Ed. साठी शासकीय दरांनुसार १००% परतफेड मिळते).
२. देखभाल भत्ता (दरमहा मिळणारी रक्कम): विद्यार्थिनीच्या अभ्यासक्रमाच्या गटानुसार (Group A ते E) आणि ती वसतिगृहात राहते (Hosteller) की घरून ये-जा करते (Day Scholar) यावर हा भत्ता ठरतो.
गट अ (Group A): वसतिगृह - ₹४२५ / डे स्कॉलर - ₹१९०
गट ब (Group B): वसतिगृह - ₹२९० / डे स्कॉलर - ₹१९०
गट क (Group C): वसतिगृह - ₹२९० / डे स्कॉलर - ₹१९०
गट ड (Group D): वसतिगृह - ₹२३० / डे स्कॉलर - ₹१२०
गट ई (Group E): वसतिगृह - ₹१५० / डे स्कॉलर - ₹९०
(टीप: विद्यार्थिनी शासकीय वसतिगृहात राहात असल्यास तिला देखभाल भत्त्याच्या केवळ १/३ रक्कम मिळते. महिन्याच्या २० तारखेपूर्वी प्रवेश घेतल्यास त्याच महिन्यापासून भत्ता सुरू होतो, अन्यथा पुढील महिन्यापासून मिळतो.)
पात्रतेचे महत्त्वाचे निकष (Eligibility Criteria)
- विद्यार्थिनी ओबीसी (OBC) प्रवर्गातील आणि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी किंवा समतुल्य असावे.
- व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थिनीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून (CAP Round) प्रवेश घेतलेला असावा.
- महाविद्यालयात विद्यार्थिनीची किमान ७५ टक्के उपस्थिती (Attendance) अनिवार्य आहे.
- कुटुंबातील सर्व मुली या शिष्यवृत्तीस पात्र आहेत (मुलांसाठी केवळ पहिली दोन मुले पात्र असतात).
- एकाच वेळी इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
- शिक्षणातील बदल: गैर-व्यावसायिक अभ्यासक्रम सोडून व्यावसायिक निवडल्यास लाभ मिळेल. मात्र, व्यावसायिक सोडून गैर-व्यावसायिक निवडल्यास विद्यार्थिनी अपात्र ठरेल.
शिष्यवृत्ती नूतनीकरणाचे नियम (Renewal Policy)
- नूतनीकरणासाठी विद्यार्थिनीने मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे आहे.
- नापास झाल्यास: 'गट अ' च्या अभ्यासक्रमासाठी पहिल्यांदा नापास झाल्यास शिष्यवृत्तीचे नूतनीकरण केले जाऊ शकते. मात्र 'गट ब, क, ड, ई' च्या अभ्यासक्रमांसाठी नापास झाल्यास त्या वर्षाची भरपाई मिळत नाही. पुढील वर्गात पदोन्नती (Promote) मिळाल्यावरच पुन्हा लाभ सुरू होतो.
- वैद्यकीय कारणास्तव परीक्षा न देता आल्यास, योग्य पुराव्यांनिशी प्राचार्यांच्या शिफारसीवरून लाभ सुरू राहू शकतो.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
१. जातीचा दाखला (Caste Certificate)
२. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला / घोषणापत्र (Income Certificate).
३. व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Validity) सक्तीचे आहे.
४. १०वी, १२वी किंवा मागील उत्तीर्ण परीक्षेचे गुणपत्रक.
५. शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate).
६. गॅप सर्टिफिकेट (शिक्षणात खंड असल्यास).
७. रेशन कार्ड (Ration Card).
८. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या मुलांची संख्या दर्शवणारे पालकांचे घोषणापत्र.
९. वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास).
अर्ज प्रक्रिया आणि कालावधी
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थिनींनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर MahaID चा वापर करून ऑनलाइन अर्ज सादर करावा. हा अर्ज सबमिट केल्यानंतर मंजूर होण्यासाठी साधारण ३० कामाचे दिवस (Working Days) लागतात.
मान्यता देणारे प्राधिकरण: संबंधित विभागाचे सहाय्यक संचालक.
तक्रार निवारण अधिकारी: संबंधित प्रादेशिक उपसंचालक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा